माझी आवडती शाळा.....
(Nirgude, Tal. Junnar, Dist. Pune)
१९९४ ते १९९६-९७
छान वाटतं बोलवायला ना कि फक्त शाळा जरी म्हणते तरी आपले मन लगेच आपल्या बालपणात जातं. आपली शाळा आठवते. आपले जवळचे मित्र, जीव लावणारे शिक्षक आणि सर्वात महत्वाचे मार देणारे शिक्षकही आठवतात.
"छडी लागे छम छम विद्या येई घम घम"
खरच ते खुप गोड दिवस असायचे. हे आत्ता समजायला लागलं, पुन्हा ते दिवस येणे नाही. शाळेत असताना मस्ती मौज-मजा खुप असायची. तेवढेच मस्करी-भांडणही असायचं. आपले शिक्षक आपल्याला सतत मारतात हे त्या वेळेस खुप वाईट वाटायचे, पण आत्ता समजले तो मार आपल्यासाठीच खुप महत्वाचा असायचा.
शिक्षक विनाकारण कधीच मारत नसायचे. अपूर्ण गृहपाठ, पाढे पाठ नाही, शाळेची दांडी, शाळेत उशीरा येणे वैगरे कारणे असायचे आणि असे एक-एक किस्से असायचे की आत्ता आठवले तरी गालातल्या-गालात हसायला येत.
आपल्या शाळेचा वर्ग म्हणजे सर्वात पुढच्या बाकावर बसलेले आपले मित्र म्हणजे सर्वात हुशार गणले जायचे. मध्यम भागात बसलेले ना हुशार ना ढ, आणि मागच्या बाकावर बसलेले काही विचारायला नकोच, त्यांची गणना मस्तीखोर-भांडखोर, "ढ" अशीच असायची.

आपल्या मित्रांना आपण कसे आहोत हे चांगले माहीत असून पण सोबत राहायचे, बोलायचे, मस्ती-माजक, अभ्यास करणे, सोबत खेळणे आणि सोबत मारही खायचे.
तसे पाहिले तर माझी शाळा ह्या तीन झाले, कारण वडिलांची बदली झाली की शाळाही बदलायची. माझी शाळा खेड्यापाड्यात असायची. सिटी(शहर) काय असायचं हे पुस्तकातच माहीत होतं.
शाळेचा पहिला दिवस म्हणजे स्वःताची ओळख सांगणे, आपले प्रमुख वर्गशिक्षक, शेजारी - आजूबाजूची ओळख करून घेणे यातच जात असे. पण मलाच सारखं वाटायचं मी या वर्गात नवीन आहे, खूप लाजल्यासारखं वाटायचं, आपल्यालाच सर्व बघतात ही भावना पाच-सहा दिवस मनात राहायची.
बाकी मुलांसोबत ओळख हळूहळू होत असे. नंतर लक्षात यायचं अरे या वर्गात मीच नवीन नाही अजून सात-आठ आहेत आपल्या सोबत. मग मनातली भीती जायची.
घरापासून शाळा दहा ते बारा किलोमीटर होती, म्हणून मला एसटी ने प्रवास करायला लागायचा. त्या वेळेस ४थी ते ६वी पर्यंत शाळेत एसटी ने प्रवास केला. छान वाटायचं एसटी ने शाळेत जायला.
शाळेत मला कोंबड्याच घड्याळ या नावाने ओळखले जायचे. कारण माझ्याकडे एक हातातले घड्याळ होते त्यातून कोंबड्याचा (आवाज येत असे) आलार्म वाजायचा.
शाळेत मी सर्वांचा लाडका असल्यामुळे ६वी ला मॉनिटर पदाची संधी आली. त्या आधी सफाई मंत्री होतो, म्हणजे कोणी कचरा-वहीपुस्तक फाडून टाकलेला कागद, पेन्सिल शार्प करून केलेला कचरा इत्यादी चा दंड वसूल करण्याचा अधिकार मला असायचा. दंड २५पैसे/५०पैसे असायचा आणि त्या जमलेल्या ९-१० रुपयातून दर गुरुवारी शाळेत नारळ-खडीसाखर-अगरबत्ती आणून पूजा करायची. मग नारळ फोडून त्याचे तुकडे करून प्रसाद सर्व वर्गात वाटायचे. नारळ फोडण्याचा पहिला मान माझा असायचा, पहिला प्रसाद देवाचा, दुसरा आपले वर्गशिक्षक, तिसरा आपला वर्ग आणि प्रसाद जास्तच राहिला तरच मुख्याध्यापक ऑफिस मध्ये जायचा.

तसे वर्गात मंत्री भरपूर होते. आरोग्य मंत्री, साफसफाई मंत्री, क्रिडा मंत्री, तपासणीक मंत्री(गृहपाठ, निबंध तपासणे) इत्यादी.
आम्ही शाळेत नाटक हि बसवायचो, माझी भूमिका श्री कृष्ण यांची होती. ३० ते ३५मिनिट हातात बासुरी घेऊन उभे राहायचे, बाकी तिकडे काही होऊ आपण शांत उभे राहायचे हेच डोक्यात होत.
रक्षाबंधन म्हणजे दोन्ही हात राखीने भरून जायचे.
आजही त्या गावाची यात्रा/जत्रा आठवते, ज्या दिवशी जत्रा त्या दिवशी शाळा लवकर सुटायची आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी असायची. मग काय प्रत्येक मित्रांसोबत घरी जाऊन पुरण-पोळी दाबून जेवायचो. असे वाटायचे की संपूर्ण वर्षाचे आजच जेवलो आहे. माझा शिवाजी नावाचा मित्र माझ्यासाठी चिंच / कैरी / आंबे आणायचा, मला झाडावर चढता नाही यायचं पण तो माझ्या साठी झाड्याच्या टोकावर जायचा. बाकी सचिन, रविंद्र, पुनम, मनीषा, कांचन, दिपाली, बाळू, शितल, संदीप आणि बाकी सर्वच मित्र-मैत्रीण छान होते. दुपारची जेवणाची सुट्टी-सर्वच एकत्र जेवायला बसायचो. शाळेची सहल म्हणजे विचारायलाच नको, आम्ही खुप धम्माल करायचो.
माझ्या वडिलांनी शाळेसाठी थोडी मदत केली होती, प्रत्येक वर्गात क्लास नुसार पाट्या आणि काही देणगी दिली होती.
शाळेचे नाव माझा मोठा दादाने मोठे केले, तो सर्वात हुशार आणि सर्व विषयात तालुक्यात पहिला यायचा. म्हणून दादा सोबत मी पण सर्वांचा लाडका होतो. तो माझ्यापेक्षा ३ वर्षाने मोठा होता.
मी ६वी पास झालो, तो माझ्या शाळेचा शेवटचा दिवस होता. कारण वडिलांची बदली दुसऱ्या गावात झाली होती. ६वी चा निकाल आणायला गेलो, सर्व मित्र परिवार भेटले. माझ्या डोळ्यात अश्रू अनावर झाले, सर्वांना समजले हा विशाल चा शाळेचा शेवटचा दिवस. त्यांना हि वाईट वाटले. त्या काळात कोणाकडे मोबाईल / फोन वैगेरे काहीच नव्हतं.
आम्ही या २०१९ मध्ये फेसबुक मुळे सर्व मित्र भेटले आणि आजसुध्दा व्हाट्सएपच्या माध्यमातून एकमेकांच्या जवळ आहोत.
मग झालं आता पुन्हा नवीन शाळा पुन्हा नवीन मित्र.....
आता ७वी ते ९वी, शाळेचा पहिला दिवस, तीच नवीन ओळख, नवीन शिक्षक, फक्त जागा वेगळी मात्र शाळा हे नाव सारखेच.
पुढील कथा शाळेच्या गमती-जमती भाग २ मध्ये नमूद केले आहेत.
टिप्पण्या