एका जिवलग आत्म्याची गोष्ट

काळी विहिर
(घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.)

हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे.
वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली.
झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता.
बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस.
जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्याबरोबर ओळखले. कसे काय वगैरे विचारपूस झाली.
आपसूकच विहिरीकडे पाय वळले. बाहेरून आलो कि पहिले विहिरीकडे जाऊन हातपाय धुवायचे अन नंतरच घरात यायचं हि लहानपणापासूनची सवय अगदी हे घर सोडेपर्यंत नाही सुटली. विहीर अजूनही तशीच मजबूत, कठड्याला लगटून जुनाट दोरी आणि बादली आधी जसे राहायचे तसेच ठेवले होते, पण आज बादली गंजून गेलेली आणि बुडाला मोठ्ठ भोक पडलेली होती. नवीन आणून ठेवायला हवी.
कठड्यावर हात ठेऊन विहिरीत डोकावून बघितलं आणि दिसलं फक्त काळं पाणी. अगदी अमावसेचा अंधार कालवल्यासारखं, सोबत हिरवकंच शेवाळ आणि विहीराच्या कोपर्यात मेलेला आणि पोट फुगून तरंगणारा करड्या रंगाचा बेडूक. पूर्वी विहिरीत पाण्यामध्ये तासनतास स्वतःला न्याहाळत उभा राहायचो, आंब्याची तुटलेली डहाळी पडल्यावर उमटणारे ओहळ बघत दिवस तसाच जायचा, आज विहिरीत काळं पाणी आणि शेवाळच दिसत होत.

पाणी पिण्यासारखं नव्हत, पिण्याच्या पाण्याची सोय बाहेरून करावी लागत असेल, असा विचार करत परत मागे वळत असतानाच पाण्यात काहीतरी चमकलं.. बारकाईने बघितल्यावर डोळ्यांसारखं काहीतरी ओझरतं दिसलं.. आणि विहिरीत आवाज घुमला..

""विशल्या.... आलास का रे.....""???

मी जागच्या जागीच हादरलो.. बाळाचा आवाज होता तो.. (बाळा म्हणजे माझा लहानपणीचा जिवलग मित्र बाळासाहेब, तो मला विशल्या या नावानेच हाक मारायचा) माझे हात-पाय लटलट कायपला लागले, डोळ्यासमोर अंधार झाला आणि मी जागीच कोसळलो......!!!!
"विशाल...
अरे विशाल....
अरे डोळे उघड..
कधी आलास....??"
कोणीतरी तोंडावर पाणी मारलं, डोळे उघडले तेव्हा बाळाची आजी शेवंता बाजूला बसल्या होत्या, शेवंता आजी म्हणजे मुकादम काकांची आई, बाळासाहेब त्यांचा नातू.

“अरे काय झालं अचानक तूला? अन कसा काय तिथे त्या विहिरीजवळ बेशुद्ध पडला होतास? अरे तुझ्यासाठी पाणी आणायला गेले होते.."

“शेवंता आजी... मला विहिरी मधून बाळाचा आवाज ऐकू आला...”
शेवंता आजी थोड्या वेळ गप्प बसल्या, मी विचारलं अहो, बाळा कुठे आहे दिसत नाही, तो नाही घरात, बाहेर गेला आहे का ? मी खास त्यालाच भेटायला आलो आहे... आजी अजून पण खालीच मान घालून शांत बसली होती.
शांतपने आजी उत्तरल्या,
बाळा... बाळा तर.. "आम्हाला सोडून कधीच निघून गेला" मी म्हणालो सोडून म्हणजे काय घर सोडून दुसरीकडे गेला का राहायला?
आजी म्हणाल्या, हो देवाघरी गेला....
हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले.
पण... पण... कसे असे अचानक आजी ?
अरे त्याला काय झालं होतं माहीत नाही, वेड्यासारखा करायचा तो, शेतात-रानात पळत सुटायचा, माणसांना ओळखत नसायचा, एकटा बसून एकटाच काही तरी बडबड करायचा.
अरे देवा, मग तुम्ही डॉक्टर ला नाही दाखवले? नंतर काय झालं ?
नंतर त्याने या विहिरीत जीव दिला, आणि आम्हाला कायमचा सोडून निघून गेला.
हे ऐकून तर माझ्या अंगावर काटाच आला.
मुकादम काका काही कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. मग त्या रात्री शेवंता आजीकडेच झोपलो पण डोक्यात नुसतीच... ती विहीर.. ते आपल्याकडे लुकलुकणारे डोळे.. आणि तो आवाज फिरत होता..!! तो पण बाळासाहेबचा आवाज...
मध्यरात्री कुत्रांचा भुंकण्याचा आवाज आला, तशी मला लगेच जाग आली. मी दरवाजा उघडून बाहेर गेलो, आजूबाजूला पाहिले तर सर्व अंधार, तेवढ्यात माझं लक्ष विहिरीकडे गेलं. छातीत धसका बसला.
थंडी पण खूप होती, मागे फिरलो आणि दरवाजा लावायला लागलो, तोच बाहेरून आवाज आला.... विशल्या इकडे ये... विशल्या...
मी तसाच शांत बसलो, तोंडातून एकही शब्द सुटत नव्हता... पुन्हा आवाज आला, विशल्या इकडे ये... मी दरवाजा उघडला.. बाहेर आलो - विहिरी कडे पाहिले.. आणि मला एक माणसाची आकृती दिसली... मी घाबरलो, खाली पडलेली काठी मी हातात घेतली, आणि त्या आकृती कडे दबक्या पावलांनी चालू लागलो... जवळ जाताच ती आकृती नाहीशी झाली. इतक्या थंडी मध्ये मला घाम आला होता, आजूबाजूला पाहिले कोणच नव्हते. हातातली काठी तिथेच खाली टाकून दिली आणि पुन्हा आवाज आला... विशल्या... विशल्या....
मी थोडीशी हिंम्मत करून बोललो, कोण... कोण आहे रे ? विहिरीत काही चमकल्या सारखे झालं आणि "अरे विशल्या घाबरू नकोस, मी बाळा रे... मी बाळा... येथे मला करमत नाही रे, खूप कचरा करून ठेवला आहे, विहिरीचा खूप वास येतो, काळे पाणी पिऊन माझी तहान भागत नाही... भागत नाही...."
हे शब्द कानावर पडताच मी घराकडे धाव घेतली, कसा पळत होतो ते माझं मलाच माहीत.
दरवाजा घट्ट बंद करून घेतला, मला सकाळ पर्यंत झोप लागली नाही. तेच सतत आठवत होत.
सकाळ झाली. मी अंघोळ, नास्ता केला आणि आजी ला सर्व हकीगत सांगितली. त्या विहीरिची साफसफाई करायचं आमचं ठरलं.
थोडे कामगार लोक हाताशी घेऊन आम्ही संध्याकाळ पर्यंत काम पूर्ण केले.
पाण्याची मोटार लावून शक्य तेवढे पाणी बाहेर काढले. विहीर थोडी चकाचक दिसत होती.
मी अजून 2 दिवस तिथेच थांबलो, पण मला कसलाच आवाज (बाळाचा आवाज) आला नाही.

तेच सफेद पाणी, लहानपणी पाहायचो तसंच पण त्यात मी आज स्वतःला तसाच बघू शकत होतो नेहमीसारखचं.. जसं पूर्वी बघायचो...

पण कोपर्यंतला तो करड्या रंगाचा मेलेला बेडूक मात्र आज नव्हता. कदाचित मुक्ती मिळाली असावी त्याला पण...!

(मी या विहिरीचा मोबाईल मध्ये फोटो काढायला गेलो पण मेमरी फुल असे दाखवत होते, म्हणून मी मोबाईल गॅलरी मधून जाऊन थोडे विडिओ/गाणी कट केले, फोटो काढायला क्लिक केले फोटो काढला, पण गॅलरी मध्ये दिसत नव्हता.
असे ५-६ वेळा प्रयत्न केला. मला वाटले की मोबाईल खराब झाला असावा, तितक्यात आवाज आला, अरे विशल्या, "तू कितीही फोटो काढले तरी मी नाही दिसणार तुला.......")

आजही या विहिरी जवळ गेल्यावर तसाच भास होतो आणि आत्ता पण मोबाईल मध्ये फोटो येत नाही

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
सर तुम्ही गोष्टी छान करता. अजून अश्याच भुताच्या गोष्टी लिहीत जा
अनामित म्हणाले…
भीतीदायक आहे
अनामित म्हणाले…
सर, तुम्ही पुस्तक पण चांगले लिहू शकता,
लिखाण चांगले आहे सर तुमचे.
Jitu... म्हणाले…
Good,
तुमच्या व इतरांच्या पण अनुभव असेच शेयर करत रहा मित्रा 👍🏻
खुप छान भाऊ , मना मध्ये कधीही चिंता दुख ठेवू नये ती नेहमी स्वच्छ वर नेहमी मोकळ ठेवाव , कथा हेच सांगते चिंते च भूत असू नये 😊👏🏼👌🏼

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी, बारावीच्या परीक्षा 8 ते 10 दिवस आधी, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

कधी कधी असं का होतं

Udise Plus Students Promotion / Class Promotion 2023-24 (UDISE+ 2022-23) युडायस प्लस

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25