एका जिवलग आत्म्याची गोष्ट

सुवर्णा ची अपूर्ण कहाणी
खरे तर अपूर्ण कहाणी माझीच आहे. कधी वाटलं सुद्धा नव्हतं की असा एक क्षण पुन्हा माझ्या जीवनात येईल.
"कधी कधी असं का होतं", नियतीचा खेळ की नशिबाचा दोष? पण जे काही होत होतं ते चांगल्या की वाईटासाठी काहीच समजत नव्हतं.....
वडील सरकारी नोकर असल्यामुळे त्यांची सतत बदली होत होती, या गावातून त्या गावात. त्यामुळे माझी शाळा हि बदलत जायची. नववी पास झालो, आता दहावी चे वर्ष..... म्हणजे मनात भीतीचे वातावरण, म्हणून वडिलांनी एप्रिल - मे मध्ये इंग्लिश आणि गणिताचा क्लास लावला. कारण कि माझे हेच दोन विषय कच्चे असायचे.
नवीन गाव म्हटले कि सर्वच नवीन. नवीन लोक, नवीन जागा असं मन गुटमटायचे. त्या गावाच्या बस स्थानकापासून ते माझे घर चालत १० ते १२ मिनिट लागायचे. क्लास सुद्धा ५ मिनिट अंतरावर होते. त्या वेळेस माझ्याकडे सायकल होती, म्ह्णून २ मिनिट मध्ये क्लास मध्ये जायचो. हळू हळू थोडे मित्र झाले. शाळा कोणती चांगली, कोठे ऍडमिशन भेटेल वैगेरे वैगेरे माहित झाले.
क्लास संपला कि सायकलवर गावात फेरफटका मारायचो. दुकान, हॉटेल, बाजार सर्व पाहायचो आणि जिकडे राहायला होतो तिचे आजूबाजूला शेती असायची. निसर्गप्रेमी असल्यामुळे तिथे राहायला खूप छान वाटायचे.
थोडं थोडं मन रमायला लागले. थोडे मित्र हि झाले. त्यातला एक खास म्हणजे जिवलग मित्र झाला.
"प्रदिप"
मग ठरले कि तो जिकडे ऍडमिशन घेणार मी पण तिकडेच घेणार.....
दोघांनी हुतात्मा राजगुरू विद्यालय मध्ये ऍडमिशन घेतले, "तुकडी ब"
अभ्यासात थोडा कच्चा असल्यामुळे दहावी पास होईल कि नाही हि काळजी असायची. त्या मुले अभ्यासावर जास्त भर द्यावा लागायचा. म्हणतात ना "नकटीच्या लग्नात सातरा विघ्ने" आणि नेमके तसेच झाले.
दोन - तीन महिने झाले थोडे सर्वांशी तोंड ओळख झाली.
"तुकडी अ" मध्ये एक मुलगी मला खूप आवडायची, त्या वेळेस प्रेम काय असत त्याचा काही पत्ता नव्हता. माझा मित्र प्रदीपला मी विचारले अरे, ती मुलगी कोण तीच नाव आणि कुठे राहते? तो म्हणाला, वेडा आहेस का? मी म्हणालो का काय झालं? तो म्हणाला अरे ती गाववाली आहे.... मी विचारलं, 'गाववाली म्हणजे काय?' तो म्हणाला, अरे ती खूप मोठी माणसं ते वैगेरे वैगेरे.... तिच्या भावाला जर समजले तर फाडून खाईल तुला, मी पण थोडा घाबरलो. पण मी म्हणालो अरे पण फक्त आवडते रे ती मला, नाव समजेल का? तो म्हणाला "सुवर्णा".
कुठे राहते? प्रदीप म्हणाला, वाडीला.
एकाच शाळेत असल्यामुळे मी बरोबर शाळा भरताना आणि सुटल्यावर शाळेच्या गेट जवळ थांबायचो. म्हणजे तिला पाहता येईल. कधी - कधी तर मधल्या सुट्टीत मुद्दाम तिला बघण्यासाठी डब्बा देऊन तिच्या वर्गात जेवायला जायचो. ती सर्वात वेगळी मुलगी, म्हणजे एकदम शांत, तिच्या सोबत मैत्रिणी होते पण जास्त त्या मध्ये मिसळायची नाही. दिसायला हि सुंदर - कुरुळे केस, कधी कधी चेहऱ्यावर केसांची बट.
एक विशेष म्हणजे इतकी श्रीमंत असून पण साधी भोळी राहायची, म्हणून ती मला खूप आवडायची.
एक दिवस तर तिच्या मागे मागे तिचा डोळा चुकवत तिच्या घरापर्यंत गेलो, मनात आस होती कि सुवर्ण नक्की राहते कुठे. जी व्यक्ती आवडते तिच्या बद्दल जाणून घ्यायला जास्तच आवड निर्माण होते. तीच घर हि छान होत, अगदी रोड च्या बाजूला.... म्हणजे जात येता सुवर्णा दिसायची. वाडी लहान होती आणि मनात भीत हि वाटायची कि कोणी विचारले तर इकडे काय करतो मग.... म्हणून एक दोन वेळा तिला पाहून झाले कि घरचा रास्ता पकडायचो. घरी गेलो तरी डोक्यात तिचाच विचार. झोप हि लागायची नाही, डोळ्यासमोर आज ती किती वेळा दिसली तेच दिसायचं.
योगा - योग असा झाला कि, वडिलांना कामावर जायला - यायला लांब होत होते, पण त्या वाडी पासून कामावर जायला कमी वेळ लागत असे, म्हणून एक भाड्याने तिथे घर पहिले. घर पाहायला तर मीच जास्त मदत केली, कारण मला घर पाहायचे होते ते सुवर्णाच्या घराच्या आजूबाजूला. खूप प्रयत्न केल्यावर शेवटी २०० मीटर अंतरावर एक घर भेटले. माझे व तिच्या घरामध्ये एक रोड होता. अंतर थोडं होत पण जवळ आहे याचा आनंद होत असे. मी इतका खुश झालो कि सांगता सोया नाही.
संध्याकाळ झाली की मी माझ्या गुड्डी ला घेऊन तिच्या घराच्या आस-पास फिरायला जायचो. (गुड्डी म्हणजे माझी पाळीव डॉगी)
"तर मग आता तिच्या मागे मागे जायची गरज पण होते आणि मागे मागे यायची पण"
त्या दिवसापासून मी सायकल चालवणे सोडून दिली कारण ती चालत चालत शाळेत जात असत. पण मी तिला कधीच समजून दिले नाही कि मी तिचा पाटलाग करतो किव्हा मला आवडते असे काही. दहावी चे अर्धे वर्ष संपत आले तरी माझी काही हिंम्मत झाली नाही तिला माझ्या मनातले सांगायला. तिच्या सोबत मैत्री करायला खूप प्रयत्न केले. विचार केला एकदा मैत्री झाली कि तिला माझ्या मनातले सांगायला आणि तिच्या मैत्रिणीला पण सांगायची भीती वाटत होती. पण तेच तर ती खरंच वेगळी मुलगी होती, सर्वात वेगळी. कदाचित तिला समजले ही असेल मी सारखा सारखा हा माझ्या आजूबाजूला दिसतो.
हे असं दहावी संपत पर्यंत झालं. कसा बसा काठावर पास झालो. तीन वर्ष म्हणजे दहावी ते बारावी तिथेच, पण या तीन वर्षात काय माझी हिंमत झाली नाही, मनात विचार यायचे की जर मी तिला प्रेमाबद्दल विचारले आणि ती नाहीच बोलली तर जेवढे प्रेम आहे तेवढे पण राहणार नाही.
त्या वेळेस एक वेगळे वळण जीवनात आले. वडिलांची बदली दुसऱ्या गावात झाली. खूप वाईट वाटले, रडलो ही, माझे दुःख मलाच माहीत. प्रदीप पण दुरावला. तो म्हणाला, जाऊदे रे तिच्या पेक्षा तुला चांगली मुलगी मिळेल, पण त्याला काय माहीत माझं मन कुठे अडकले होते ते.
त्या वेळेस कसले फोन - मोबाईल आणि कसले काय.
ग्रॅज्युअटचं दुसरे वर्ष झालं तेव्हा कुठे वडिलांनी मोबाईल घेऊन दिला. तसे मी अधून मधून प्रदीपच्या नावाने त्या गावात तिच्या घराकडे जायचो पण कधीच ती मला दिसली नाही. नंतर फेसबुक हे नवीन सोशल मिडीआ आले, मग सुवर्णाची आणि तिच्या मैत्रिणींची शोधाशोध सुरू. पण त्यात पण अपयश आले. वाटले की सुवर्णाचे कधीच लग्न झाले असेल....
त्या नंतर १२ ते १३ वर्षाने तिच्या एक मैत्रिणीने मला फेसबुक वर रिक्वेस्ट सेंड केली. छान वाटले कारण इतक्या वर्षापासून जी वाट पाहत होतो ती वेळ आली. हिचे लग्न होऊन २ मुले, संसार सुखाचा. वाह छान वाटले पाहून. त्यात एक नवीन ऍप आले ते म्हणजे व्हाट्स ऍप. मोबाईल नंबर ची देवाण-घेवाण झाली. मग विषय आला सुवर्णाचा, तिला विचारले "काय गं, सुवर्णा कुठे आहे, भेटती की नाही, लग्न झाले का ? काय करते, आता नक्की कुठे आहे? फेसबुक वर आहे का ? ती म्हणाली अरे हळू..... किती प्रश्न एकदम विचारशील जरा दम घे. मला माहित होतं तुला ती आवडायची. अरे मग विचारले का नाही? मी म्हणालो अगं नाही गं हिंम्मत नाही झाली, भीती वाटत होती. बरं सांग ना ती कुठे आहे. ती म्हणाली, आहे जिथे राहत होती तिथेच आहे. मग मी दबक्या आवाजात विचारलं, काय गं तीच लग्न वैगेरे झालं का? ती म्हणाली, अ अ... अरे (माझ्या हृदय धड धड करत होत - स्वास ही घेणं थांबलं) अरे... नाही अजून.
हुश..श... मी विचारलं, का सर्वांची लग्न झाले पण तिचं राहील बघ.
थोड्या वेळेने मी तिला विचारले, ती फेसबुकवर आहे का नंबर दे. तिने फेसबुक लिंक सेंड केली नंबर ही दिला, पण मनात तोच प्रश्न तिला माझ्या बद्दल कसे सांगायचे... फेसबुक वर तिला रिक्वेस्ट सेंड केली एक आठवडा गेला मी दर १ ते २ तासाने पाहायचो की सुवर्णाने रिक्वेस्ट घेतली का नाही... मग तिच्या मैत्रिणी ने एक व्हाट्सएप ग्रुप बनवला त्यात जेवढे शाळेतले आणि कॉलेज चे मित्र-मैत्रिणी होते त्यात ऍड केले. तिचा डीपी (प्रोफाईल फोटो) न चुकता रोज बघायचो. ग्रुप वर जरा हटके म्हणजे सर्वांपेक्षा वेगळे मेसेज पाठवायचो. बघू काय तिचा रिप्लाय येतो की नाही म्हणून..... पण नाही ती जशी शाळेत सर्वांपेक्षा वेगळी होती तशीच या ग्रुप मध्ये पण सर्वांपेक्षा वेगळी होतीच.
मग असेच रोज गुड मॉर्निंग - गुड नाईट - हाय वैगेरे होत होते. एक दिवस मीच तिला विचारले, काय गं लग्न झाले की नाही ? ती म्हणाली नाही घरचे पाहत आहे मुलगा. मी म्हणालो अच्छा, भेटेल भेटेल चांगला मुलगा भेटेल. (पण तिला माहीत नव्हतं, माझं मन तिच्यासाठी झुरत होतं) आणि मी पण माझ्या मनातले तिला सांगू शकलो नाही कारण सुवर्णा बद्दल समजले तेव्हा माझ्या लग्नाला १ वर्ष होऊन गेले होते. जर माझे लग्न नसते झाले तर नक्कीच तिला माझ्या बद्दल सांगितले असते.
त्याच्या ५-६ दिवसाने तिने मला सांगितले माझे लग्न ठरले आहे. (खुप छान वाटले पुन्हा एकदा आनंदाने डोळे पाणावले) कारण मनाला चांगले ही वाटले की इतके वर्ष लग्न केले नाही आता होत आहे. मी म्हणालो, "अभिनंदन" मुलगा कुठला आहे? ती म्हणाली पुणेकर पुणेचाच आहे. (थोडं मनाला बरे वाटले, कारण ती पुणेमध्येच राहणार आहे)
आणि मी हसत तिला म्हणालो, लग्न झाले तरी विसरू नका.
लग्न झाले, लग्नाला बोलावलेही होते मला, पण जायला जमले नाही. हे माझं दुर्भाग्यच होत.
सर्वात महत्वाचे म्हणजे पुणे मध्ये मी जेथे राहतो तिथून फक्त २ किलोमीटर (तिच्या गावाला असताना २०० मीटर) अंतरावर तिचे सासर. मग काय जसे शाळेत असताना तिच्या घराबाहेर चक्कर मारायचो तसेच येता जाता घरा कडे नजर जाते. पण आज ही ती मला समोर दिसली नाही. १६ ते १७ वर्ष अजून मी तिला समोर पाहिले नाही.
ज्या दिवशी दिसेल तो दिवस माझ्यासाठी खास असेल. पण आता वेळ गेली, वेळेला खूप किंमत असते. कदाचित ते गाव मी सोडले तेव्हाच तिला विचारायला पाहिजे होत... निदान समजले तरी असतं की तिच्या मनात माझ्याबद्दल काय आहे. आणि आता विचारावे तर लग्न तिचे ही झाले आणि माझे ही. पण आजूनसुद्धा मी आनंदी आहे, जर तिने त्या वेळेस नकार दिला असता तर ती माझ्या इतक्या जवळ राहून पण मला समजले नसते की ती लग्न करून येथे आली आहे आणि होकार असता तर आज एकाच घरात राहिलो असतो.
सकाळीच तिने माझा अपकमिंग व्हाट्सएप स्टेटस पहिला, "म्हणाली तुम्ही स्टोरी पण लिहिता का? नक्कीच वाचेल तुम्ही लिहिलेली स्टोरी मी".
म्हणून तर,
"कधी कधी असं का होतं", नियतीचा खेळ की नशिबाचा दोष? पण जे काही होत होतं ते चांगल्या की वाईटासाठी काहीच समजत नाही.....
सॉरी, पण जे मनात होत ते खरं खरं सांगितले. कारण एकच व्यक्ती जी आवडते ती योगायोगाने समोर येत नाही, त्या मागे काही हेतू, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असल्याशिवाय नाहीच..... आणि खरे प्रेम कोणापासून लपत नाही, कधी ना कधी समोर येतेच.....
खरे तर अपूर्ण कहाणी माझीच आहे. कधी वाटलं सुद्धा नव्हतं की असा एक क्षण पुन्हा माझ्या जीवनात येईल.
टिप्पण्या