ही एक सत्य घटना आहे. (चिखली, पोखरी - भीमाशंकर, पुणे) माझ्या लहानपणी ची. इयत्ता ८वीत होतो मी दिवाळीत शाळेला सुट्टी पडली की मी काकांच्या गावी जायचो. खुप धम्माल असायची. तिकडे फिरायला खूप आवडायचं मला. काका व सर्व परिवार शेती करायचे, काकांचा मुलगा म्हणजे माझा चुलत भाऊ बंडू आम्ही खूप जिवलग मित्रांसारखे होतो. माझे आई बाबा माझे खुप लाड करायचे. आणि काकांच्या घरी देखील मी सर्वांचा आवडता होतो. माझे चुलत भाऊ पैकी काही जण माझ्यापेक्षा वयाने दोन ते तीन वर्षे मोठे असतील त्यामुळे त्यांच्याशी माझी चांगलीच गट्टी जमलेली होती. ते सुद्धा वाट बघत असायचे मी केव्हा येतोय.
माझा चुलत भाऊ बंडू आढारी हा माझा एकदम खास असायचा. मी त्याच्याच सोबत असायचो. मग ते शेतात असो, नदीवर आंघोळ असो की संध्याकाळी बाजारात असो आमची जोड़ी ठरलेली. असेच एका संध्याकाळी आम्ही बाजारात गेलो. काकांनी फटाके खरेदी करण्यासाठी पैसे दिले होते. आम्ही दोघानी फटाके खरेदी केले, एसटी स्टॉप च्या बाजूला असलेल्या वडापाव च्या गाडिवर वडापाव खाल्ले आणि घराकडे निघालो. बाजार ते घर अस २०-२५ मिनीटाच अंतर एवढंच की बाजारातून निघाल्यावर एक टेकड़ी पार करुन खाली आल्यावर नदी लागते त्या नदीचा पूल ओलांडून पलीकडे आले की परत एक टेकड़ी चढून पार केल्यावर काकांचे घर होते. संध्याकाळी ७:३५ च्या दरम्यान आम्ही ती टेकड़ी पार करुन नदीच्या पुला जवळ आलो. तेव्हा काळोख झाला होता. हातात बैटरी नव्हती त्यामुळे खाचा खळग्यातुन वाट शोधत आम्ही चाललो होतो. तेवढ्यात आमच्या मागून कोणी तरी चालत असल्याचा भास झाला. मागे वळून पाहिल तर कोणी नव्हते. बंडू भाऊला कसली तरी शंका आली म्हणून त्याने माझा हात पकडला आणि म्हणाला मागे बघू नको चल पटापट... मला काही कळले नव्हते. नदीचा पुल जसे क्रॉस करू लागलो तसा मागून येणारा आवाज जास्तच जाणवू लागला. रात्र अमावस्येची होती. काहीतरी विपरीत आपल्यासोबत घड़नार याची शंका बंडूला आली होती. काहीच दिसत नव्हते, खुप काळोख दिसत होता. पण हळू हळू तो आवाज आपल्या जवळ येतोय एवढे कळत होते. नदीचा पुल उतरून पलीकडे आलो तर नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या स्मशानात कोणाचे तरी प्रेत जळत होते, त्याचा उजेड आम्हाला दिसला आणि पाठोपाठ येणाऱ्या आवाजासोबत काहीतरी पांढऱ्या रंगाची ओबड़ धोबड़ आकृतीचे चित्र पुसटसे दिसत होते. आता बंडू आणि मी खुप घाबरलो होतो. नदी लगतच असलेली टेकडीचा टप्पा पार करुन गेलो म्हणजे सुटलो हे आम्हाला माहीत होतं. त्याने माझा हात घट्ट पकडून जवळ जवळ फरफटतच त्या चढणीने मला खेचत आणले. वर आल्यावर काकांच्या वस्तीतील घरांच्या दिव्यांचा उजेड दिसू लागला तसा आमच्या जीवात जीव आला. तिथुन आम्ही दोघानीही घराकडे धावतच धूम ठोकली...
घरी आल्यावर पाहिले तर सर्व जण आमची वाट बघत होते कारण बाजुच्या वाड़ीत मयत झाले होते आणि ते नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या स्मशानात जळत होते. आम्ही दोघे ही घाबरलेले होतो त्यामुळे आम्हाला कोणी काही बोलले नाही. परंतु आमच्या दोघांच्या ही मनात एक प्रश्न होता तो म्हणजे आपल्या मागून येणारी ती आकृति क़ाय असेल. आम्ही दोघे एकमेकांचे चेहरे बघत होतो पण तोंडातुन शब्द निघेना. ५ ते १० मिनिटातच सगळ्या शंकांचे निरसन झाले. आम्ही आलेल्या वाटेने एक बिचार गाढव लंगड़त लंगड़त येत होत आणि त्याच्या पाठीवर पांढऱ्या रंगाच पोत होत. त्याला पाहिल्यानंतर आम्ही दोघेही हसायला लागलो. क़ाय झाल होत ते फक्त आम्हा दोघानाच माहित होत आणि बाकी सगळे आमच्या चेहरयाकडे पाहत होते कारण त्यांना माहित नव्हतं आम्ही नक्की का हसतोय....
टिप्पण्या