एका जिवलग आत्म्याची गोष्ट

पावसाळ्याचे दिवस, त्यात मुंबईच्या लोकल चा प्रवास म्हणजे सांगायलाच नको. डोंबिवली ते भायखळा प्रवास, नेहमी प्रमाणे मी ऑफिस ला पोहचलो.
ऑफिस ला गेलो की पहिला चहा असायचा, मस्त वाटायचं कारण त्याची चव आज ही मला आठवते. चहा पीत असताना संगीता मॅडम म्हणाल्या सावकाश पी आज भरपूर कामं आहेत. मी ओळखून गेलो आज कॅश किंव्हा चेक साठी बाहेर पाठवणार. संगीता मॅडम छान होते म्हणजे त्याच्या कामाचे स्वरूप, एकमेकांना मदत करणे, काही चुकले की न रागावता समजावून सांगणे इत्यादी.
मी चहा घेतला आणि मॅडम कडे गेलो, म्हणालो द्या पत्ता... कोणाचा चेक आहे? मॅडम म्हणाले हुशार झालास रे... तुला आधीच सर्व कळतं. मी म्हणालो हो मग माझ्या गुरूच्या मनातले ऐकायला नको का?
मॅडम म्हणाले, ठिक आहे ठीक आहे... कुर्लाला जावे लागेल आणि दुपारपर्यंत जेवण करून ऑफिस ला पुन्हा ये. उद्याच चेक टाकावा लागेल आणि डाटा पण अपडेत करायचा आहे. मी म्हणालो ठिक आहे असा गेलो आणि असा आलो.
खरेतर पाऊस म्हटले की मला थोडं किचकट वाटायचं आणि लोकल चा प्रवास म्हणजे नकोसाच...
पण ज्याला सवय झाली त्याला याचे काहीच वाटत नाही, बरोबर ना?
कशीबशी लोकल पकडून कुर्लाला उतरलो, रिक्षावाल्याला विचारले बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स किती घेणार तो म्हणाला ३०रु, मी विचारले चालत किती वेळ लागेल तो म्हणाला २५-३० मिनिट लागतील. मी विचार केला अजून भरपूर वेळ आहे मग थोडं चालत जाणे बरे नाही का... मग मी निघालो विचारात- विचारात, कारण जास्त मला मुंबई चे माहीत नव्हते. जाताना मध्ये मिठी नदी लागली. पण तिच्याकडे पाहून कोण मिठी नदी बोलणार नाही.
साहेबांनी चेक दिला, तो घेतला आणि पुन्हां चालत निघालो. पाऊस येणार होता कारण ढगांचा गडगडाट चालू झाला होता. थोडं पुढे गेल्यावर भरपूर पाऊस आला. छत्री होती, पण भीती होती की कुठे चेक भिजला तर मॅडम सोडणार नाही, म्हणून एका दुकानाचा आसरा घेतला. तेवढ्यात गाडी वरून 2 मुले रस्त्याला गाडी लावून माझ्या शेजारी उभी राहिली.
त्यातला एक म्हणाला अरे यार, कधी हा पाऊस थांबणार. अर्जेन्ट काम आले की असेच होतं. माझ्या हातात छत्री होती ते ती पाहात होते. त्यातला दुसरा मला म्हणाला, अरे मित्रा २मिनिट तुझी छत्री देतोस का ? आम्ही समोरच्या चौकात जाऊन येतो. मी १मिनिट विचार केला, म्हणालो जाऊदे बिचारे काहीतरी अर्जेन्ट काम असेल. म्हणून मी म्हणालो ठिक आहे घ्या, पण लवकर या मी जास्त वेळ नाही थांबणार, मला पुढे जायचे आहे. ते दोघे म्हणाले ठिक आहे आलोच आम्ही लगेच.
मी १५मिनिट झाले वाट पाहिली. मी आशा सोडली, ते दोघे माझी छत्री घेऊन गेले, पुन्हां येणार नाही. पाऊस काही थांबत नव्हता. आणि ऑफिस ला जायची वेळही झाली. चेक भिजेल या भीतीने समोरच्या दुकानातून एक प्लास्टिक पिशवी घेतली. चेक रुमालात गुंडाळून पिशवीत ठेवला. तेवढ्यात ते दोघे माझ्या समोर उभे राहिले. मनाला थोडी शांती भेटली.
अरे मित्रा सॉरी, उशीर झाला. मी म्हणालो, काही नाही जाऊद्या, तुम्ही आले आणि मला छत्री दिली हेच खुप आहे. तो हासला आणि म्हणाला अरे मित्रा या मुंबई च्या ठिकाणी कोणावर इतकाही विश्वास टाकू नकोस की तू काही पण द्यायला तयार झालास, आम्ही आलोच नसतो तर.....? मी म्हणालो, नसते आले ठिक आहे पण तुमचं अर्जेन्ट काम या छत्री मुळे तरी झालं असतं. छत्री हजारो येतील पण ती माणुसकी आणि वेळ तुमच्या आणि माझ्या लक्षात राहिली असती.
त्यातला एक म्हणाला तू इथला नाही वाटत. मी म्हणालो हो बरोबर... मी पुणेकर..... तो म्हणाला आईयो... पुणेकर तर भामटे असतात असे ऐकले आहे. मी म्हणालो ते पण बरोबर आहे पण सर्वच पुणेकर भामटे असतातच असे नाही.
या गप्पांच्या नादात माझा वेळ आणि पाऊसही कमी झाला. त्यातला एक म्हणाला, तुला उशीर झाला आहे चल तुला कुठे जायचे तिथे सोडतो. मी म्हणालो नको १०मिनिट लागतील मला स्टेशन ला जायला. तो म्हणाला अरे मित्रा तू आमच्यासाठी इतके केले आणि तुझ्यासाठी थोडं करुदे. मी हासलो, म्हणालो ठिक आहे सोड स्टेशन ला. त्यातला एकजण तिथेच थांबला.
स्टेशन आल्यावर तो म्हणाला, तू खुप भोळा आहेस, कोणावर इतका विश्वास नको ठेऊ, लोकं फायदा घेतील. मी म्हणालो, मी तर भाग्यवान मानतो की माझ्यामुळे त्यांची कामे / फायदे पूर्ण होतील.... त्याने एक छोटसं हास्य केले.
मी स्टेशन मध्ये गेलो, मागे पाहिले असता तो तिथेच उभा मला पाहत होता......
टिप्पण्या